Monday, April 15, 2019

पर्यटनाची पंढरी... माझी राधानगरी....



                 पर्यटनाची पंढरी...
                                  माझी राधानगरी....
    

   
       परवाच माझ्या गावाचा  १११ वा वाढदिवस झाला. राजर्षी शाहूंनी वसवलेली राधानगरी. जिची स्थापना ९ फेब्रुवारी १९०८ साली झाली. खरं तर "वळीवडे" या नावानं प्रसिद्ध असणारं आणि अगदी डोंगर कपारीत वसलेलं हे गाव. याला नवीन रूप,  नवीन नाव आणि नवी प्रसिध्दी दिली ती राजर्षी शाहूं महाराज यांनी... श्रीमंत राधाबाई म्हणजेच राजर्षी शाहू महाराज्यांच्या कन्या यांच्या विवाह प्रसंगी वळीवडे चे नामांतरन राधानगरी अस केले... आणि तेथून ही नगरी जग प्रसिद्ध झाली.
         बलदंड सह्यादी च्या खांद्यावर रौध्र रूप धारण करून स्वतःचं अस्तित्व गाजवत वसलेली ही राधानगरी. पश्चिमेला असलेला फोंडा घाट गावाच्या संरक्षणासाठी सतर्क आहे.  भैरीबांभर येथील पाच बोटाच्या पिंपळाच्या झाडाखाली वसलेलं जागृत भैरी देवस्थान, हिच्यावर चौफेर नजर ठेऊन उभा आहे. गावाबाहेररून वाहणारी भोगावती नदी जी  संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करते आणि शाहूंच्या दूरदृष्टीतुन साकारलेला लक्ष्मी तलाव.
           या काळजाच्या कप्प्यात यायचं झाल्यास, याचं प्रवेशद्वार आहे मांजरखिंड... हिरवा आणि नीरव, शांत किर्र असा मांजरखिंडीचा घाट... या घाटाची सुरवात होते ती गैबीच्या तीकटी वरून... येथूनच राधानगरी आपलं अस्तित्व दाखऊ लागते... भर दिवसा झाडाखाली काळाकुट्ट अंधार... किर्रर्रर्र असा आवाज. मनमोहक गारवा. निमसदहरीत सागवानाची बाग, करवंदाच्या जाळ्या, आळुची झाडे, बांबूची बेटे, निलगिरी, बारीक झुडपे आणि घाटाच्या प्रत्येक वळणाला पांढरे शुभ्र झरे, हिरवागार डोंगर कापून बनलेली तांबट वाट...
          साधारणतः कोल्हापूर पासून ५५ ते ६० किमी आणि गैबी मधून २ ते ३ किमीचा हा प्रवास घेऊन येतो गावाच्या वेशीवर. तिथंच आहे दत्ताच डेपोजवळील मंदिर. उगवतीचे मोहक रंग आणि सूर्याची प्रत्येक किरणे उगवताना या दत्त देवाला वंदन करून राधानगरीत प्रवेश करतात... खर तर योगायोगाने जुळून आलेलं, बहुदा निसर्गाने निर्मिलेलं हे त्यांचं नातं. त्यानंतर येत ते पिंपळाच्या झाडा खाली असलेलं राधानगरी बस स्थानक, सतत गजबजलेले, बारा वाड्यांची माणसे घेऊन ओरडणारे. कल्लोळ माजवणारे...हे स्थानक, आणि त्याच्याच शेजारी असणारा राधानगरीतील प्रसिद्ध "गणेश बॉम्बे वडा आणि टी स्टॉल" प्रत्येक प्रवाश्याची भूक आणि तहान भागवण्यास सज्ज असणारी ही छोटीशी टपरी.
       खरं तर येथूनच सुरू होते शाहूंनी निर्मिलेली नवी पेठ... या पेठेच एक देखणं वैशिठ्य आहे. सुरवातीला बस स्टॉप वर असणारे सर्व धर्म पंथाचे लोक... न्हावी... सुतार... चांभार... तेली... पाटील यांची दुकाने...
मग तिथून खाली गेलं की ख्रिचन लोकांची चारच घरे. मग तेथून खाली झाडाच्या गणपती जवळ.. पाटील, सरावने, महाडिक या खानदानी लोकांची घरे...
      आणि उतरणीला असणारे योगेश कॉर्नर वरील जैन मंदिर तेथून सुरू होणारी जैन लोकांची घरे डाव्या बाजुला माळकर, पाटील, चौगले...आणि उजव्या बाजूने जैनांची निल्ले, मुधाळे परिवार मध्येच काही गुरव बंधू... जरा खाली गेलं तर वाणी आणि वैशवाणी यांची घरे... त्या समोरच सोनार आणि मग तायशेटे परिवार...
           आणि सर्वात शेवटी बडदाडे.. काळेबेरे.. आणि मुस्लिम मुल्लानी यांची घरे... त्या खाली हरिजन वसाहत...  पेठेची सुरवात बेघर वसाहत पासून आणि शेवट हरिजन वसाहत पर्यंत... आणि या पासून बाजूलाच आहे तो सतत वर्दळीत असणारा मार्केट चौक. शाहूंनी ही पेठ वसवताना असणारी दूरदृष्टी  आणि विचारसरणी खूप मोहक वाटते.
          खरं तर हा भेद गावात कधीच कुणाला आजवर जाणवून येत नाही, सर्व लोक गुण्या गोविंद्याने, ना कुठल्या धर्माचा, ना कुठल्या जातीचा, तोरा  मिरवत शिरजोर गाजवताना इथं दिसत नाही... जातीच्या नावाखाली, ना इथं कुठल्या दंगली होतात, ना भांडणे... ईद, गणेश चतुर्थी, दिवाळी, पाडवा, रमजान,  संक्रात, नाताळ आणि शिमगा यात खर तर भेदच राहत नाही... हिंदू मुस्लिम ख्रिचन दलित सारे एकच  हा आदर्श आहे या नगरीचा... इथं आंबेडकर जयंती देखील शिवजयंती प्रमाणे साजरी होते.. ज्या उद्देशाने या जयंत्या महापुरुषांनी चालू केल्या तो उद्देश आजही इथं जोपासला जातो.. शाहूं फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला इथं वाव दिला जातो.
        गावाच्या मधोमध असणारे गावंठाण... आणि
गावंठाणातील जोतिबाचे मंदीर... खूप सुंदर असा पार... देवळाच्या बाजूलाच असणाऱ्या बांबूच्या बेटाशेजारील सात आसरा देवी.
          नवरात्रीच्या वेळी साऱ्या नवरातकऱ्यांना घेऊन पालखी प्रथम जाते ती जुनी पेठेत... ओढ्याच्या पलीकडे असणारी जुनी पेठ...आई अंबाबाईचे मंदीर. तिथे दोन्ही देवांची भेट होऊन पालखी नव्या अंबाबाई मंदीरा जवळ येते... बारा बलुतेदार खरं तर यात सामील झालेले आणि एकरूप होऊन गुलालात रंगून सारे जाती भेदाचे रंग विसरून त्या रावणाचे दहन करण्यासाठी एकत्र येतात... यापूर्वी होतो तो सोने लुटण्याचा कार्यक्रम... वाढ वडीलांपासून चालत आलेली ही परंपरा पालखीचं दर्शन घेऊन सोन लुटून... महागाईचा... रोगराईचा... भुरसट विचारांचा रावण पेटविला जातो... आणि असा हा दसरा इथं संपन्न होतो...
       मराठी नव वर्षाच्या सुरवातीला  बैलगाडीला हत्तीच रूप देऊन... हत्तीच सोंग करून... गुलाल उधळीत, इथं "गावचा खेळ" देखील पार पडतो... तमाशा, लोककला, जागर, गाऱ्हाणी आणि भक्ती भावाने... गुलालउधळून एकत्र येऊन... ढोल ताशा  सोबत लेझिम आणि मशाली घेऊन खेळ खेळला जातो मानाचा हत्ती मिरवला जातो... पालखीचा घोडा खेळवला जातो. रात्री १२ च्या सुमारास आरती होते आणि तेथून पुढे जागर आणि तमाशा अश्या लोककला ना देखील हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी ही राधानगरी... आणि त्याच पहाटे संपूर्ण गावात नव्या तेजाने, नव्या आशेने, नव्या विचाराने गुडी उभारली जाते.
         या परंपरे सोबत इथं आहे ते निसर्गाचा सानिध्य पण.. उत्तुंग कड्यावरून कोसळणारे पाण्याचे प्रपात घेऊन वाहणारा राऊतवाडी धबधबा... रामनवाडी धबधबा... निरभ्र चांदणं आकाश. चमकणारे काजवे आणि डरार्व डरार्व करणारी बेडके... इथं आहे निसर्गाची भ्रमंती, गडकिल्ल्याची भटकंती... धरणाच्या मधोमध असणारा शाहूंचा "बेंझिलव्हीला", हत्ती घोडे बांधण्यासाठी असणारे त्या काळातील हत्ती महाल आजही कणा उंचावत इथं उभा आहे, आत्मिक आनंद मिळऊन देणारे परमेश्वराचे अस्तित्व.. संस्कृतीशी नाळ जोडणारे "गजा नृत्य". बाजूने वाहणारी नितळ भोगावती नदी... त्यावर साकारलेलं  त्या काळातील देशातील सर्वात मोठं धरण लक्ष्मी तलाव, सर्वात जुना पॉवर हाऊस... शेतीसाठी प्रसिद्ध असणारी "शेरी" जीच सौदर्य अनेख चित्रपट आजही खुल्या स्वरूपात दाखवत आहेत. ऊस, भात, मका, भुईमुग ही पिके.. पेरूची, फणसाची चिक्कुची बाग, बांधाला असणारी नारळीची झाडे.  हौसी गवशी आणि नवशी अश्या प्रत्येकाच्या पाऊलाना सतत खुणावते आपल्याकडे आकर्षित करते ही पश्चिम घाटाची किनार राधानगरी...
          राजकारणात रंगणारी, आणि निवडणुकीत  दंगणारी.. १२ वाडीत चर्चेत राहणारी.. आणि पुन्हा नव्याने एकत्र येणारी ही राधानगरी... हुडा... आयरेवाडी... बनाचीवाडी... जूनीपेठ...या वाड्याना स्वतःच्या खुशीत घेणारी अन् आपलंसं करणारी त्यांच्या समवेत नातं निर्मिनारी ही राधानगरी, खूप काही आहे हिच्या कडे तरी कोणत्याही गर्वाने माजून न जाता शांत उभी आहे... आपल्याच विश्वात रमलेली.. प्रत्येकाला खुणावत आहे , आपलं अस्तित्व टिकवून गप्प निरागस बाळा प्रमाणे दटून आहे...
          नुकत्याच युनेस्कोच्या जाहीर झालेल्या जागतिक वारसा यादीत हीच नाव यावं इतकं हे प्रत्येक नगरवासीयांचे श्रीमंत भाग्य.. इथं इतिहासाचा वारसा आहे.. आध्यात्मिक आरसा आहे, उदंड वैभव जपणारा  निसर्ग आहे, आणि त्याच्याच सानिध्यात वसलेलं राधानगरी अभयारण्य हे गवा, भेकर, हरीण, ससे, वाघ, कोल्हे साठी प्रसिद्ध आहे... अनेक जातीची फुलपाखरे आणि छोटी छोटी किटके, अनेक जातींची फुले वनराई इथं आहे जैवविविधता जपणारे ईदरगंज चे पठार आहे. आणि इथल्या प्रत्येक कणात शांतीच लेनं दडलेले आहे... मग असा हा अध्यात्मिक वारसा.. निसर्ग पाहण्यासाठी आपण चालत राहतो आणि अश्या प्रत्येक पाऊलाला खुणावते मग ही वाट.. पर्यटकांच्या सोईसाठी प्रत्येक ठिकाणी हॉटेल तसेच रिसॉर्ट देखील उभारली आहेत. राधानगरी म्हटलं की नारळी भात आणि दुधआंमटी प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटवेल असा हा जेवणाचा पदार्थ. इथं यायचं तर निसर्गाशी संवाद साधायला, निसर्गाशी अलगुज मांडायला मग हळू हळू हा निसर्गच आपली सारी गुपिते आपुल्या समोर खुली करतो आणि आपल्याला आश्चर्यचकित करून सोडतो अशी ही पर्यटनाची पंढरी माझी राधानगरी...
             
                          
                                  ✍️ अभिजीत तानाजी भाटळे.                                                मु/पो राधानगरी
                                         तालुका राधानगरी
                                         जिल्हा कोल्हापूर
                                         फोन ९७६४३६९०९८

   आवडलं तर नक्की शेअर करा कमेंट करा..... I love my Radhanagari...
       


गोष्ट पहिल्या प्रेमाची.... By अभिजीत भाटळे...

गोष्ट प्रेमाची...
           आठ  वर्षांपूर्वी ची गोष्ट. मी तेव्हां बारावीला होतो... नुकतंच नवीन कॉलेजात ॲडमिशन झालं होतं, किसनराव मोरे कॉलेज सरवडे...   कॉलेज खूप छान होतं पण तितकचं तिथं नियम आणि शिस्त यांचा बंधन खूप होत. पण, या नियम आणि शिस्त या बंधनातून मुक्त होऊन, जर कॉलेज विचार केला तर कॉलेज खूपच मस्त होत.
     कधी वाटलं देखील नव्हतं की आपलं पहिलं प्रेम, पुन्हा नव्याने, याच कॉलेजमध्ये भेटेल आणि तेव्हा सातवीला असणाऱ्या माझ्या वर्गातील वर्गमैत्रीण,  'अंजली' पुन्हा कॉलेजमध्ये भेटली, पण पूर्ण बदलली होती. खव्याची बर्फी.. कच्चा मॅंगोची चॉकलेट किंवा चिंचेचा गोळा देऊन तिला इम्प्रेस करावे इतकी ती छोटी राहिली नव्हती. दोन वेण्या घालणारी, त्याला लाल रंगाची रिबीन बांधून तयार केलेलं, ते तिच्या वेनीच्या शेवटी असणार लाल फुल. मराठी शाळेचा तो निळा ड्रेस आणि पांढरा शर्ट असा असणार तिचा पेहराव. दोन्ही भुवयामध्ये अष्टगंधाची नाजूक टिकली जी तिच्या सौंदर्यात अधिकच भर पाडत होती. हातामध्ये हिरव्या बांगड्या... आणि डाव्या हाता मध्ये एक घड्याळ. पायामध्ये साजेस चप्पल कधी कधी सॅंडल, सतत आवाज करणार पैंजण. नाजूक बांध्याची आणि गोल चेहऱ्याची अंजली.
        आज  पाच वर्षानंतर पुन्हा ती भेट... पहिल्या प्रेमा सोबत, भेटली ती पुन्हा म्हणून, सावराव... की झोकून द्यावं तिच्या प्रेमात या विचारात पडलो होतो. आज, उद्या, परवा तिला भेटून कस इम्प्रेस करावं हा विचार सतत डोक्यात घेऊन तिच्या मागं वणवण भटकत होतो त्या फॅन्ड्री तल्या जब्या वाणी. काही दिवसांत तिला ते जाणवल देखील, पण ती कधीच बोलली देखील नाही. पण माझा कॉन्फिडन्स ओवरच होता, खरं तर एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचं असच असत म्हणायला काही हरकत नाही.. विचार केला हा  कॉलेजच्या भीतीने बोलली नसावी असा समज डोक्यात घेऊन, पुन्हा नव्यानं तिच्या मागून फिरायच. मला मदत करणारे काही मित्र देखील होते. माझ्यासोबत, माझ्या प्रेमासाठी, तिच्या ग्रुपच्या मागे आमचा ग्रुप. बरेच दिवस चाललं होतं हे सगळ.

        कॉलेज वर एक दिवस भाषणाच्या स्पर्धा होत्या, मी ठरवलं असं ना तसं, काही ना काहीतरी करून आज अंजलीला इंप्रेस करायचं. म्हणून भाषणाच्या स्पर्धेत नाव नोंदवलं. योगायोगाने भाषणाचे विषयातील एक विषय माझ्यासाठीच होता. "प्रेमा तुझा रंग कसा" हा विषय घेऊन मी तयारीला लागलो, कुणीच या विषयावर बोलल नव्हत. आणि मी शेवटला.. शेवटचा स्पर्धेक म्हणून उरलो होतो. संपूर्ण कॉलेज माझ्या समोर होतं. हातात माईक आला,  मागच्या बाजूला कॉलेजच्या संपूर्ण टिचिंग, नॉन टीचिंग स्टाफ.
सुरुवात मी देखील त्या प्रत्येक भाषणाच्या सुरवातीसारखीच केली, जी या पूर्वी बक्षीस मिळवण्यासाठी झाली होती, आणि ठरल्या प्रमाणे मला कोणीही प्रतिसाद दिला नाही, सगळी मुलं वैतागली होती, तेच...तेच... आणि तेच ऐकून... कुणाचं काही नवीन नव्हतंच. माझ्या मनात एक भीती होती, आपल्यात नवीन आहे, माझा हेतू  वा  उद्ददेश नंबर मिळवणे नसून प्रेम मिळवणे हा होता . ज्या विषया वर इथून माग कुणी बोललोच नाही तो विषय मांडायला उभा होतो,  प्रस्तावना झाल्यानंतर जोरात म्हणालो.
प्रेम म्हणजे.. प्रेम म्हणजे.. प्रेम असतं,
तुमच आमचं सेम असतं..
याला कोणी इश्क म्हणत...
याला कोणी मोहब्बत म्हणतं..
याला कोणी लफड देखील म्हणत...
जोरात टाळ्या पडल्या... त्यातच ..
असं म्हणतोय नी म्हणतोय तोवर, मागून खुर्ची सरकून उठल्याचा आवाज आला, मराठीचे शिक्षक मगदूम सर त्यांनी हात वर उचलला, म्हटलं आता मेलो.. माझे तर काळजाचे ठोके वाढले. आधीपासूनच अर्धवट लक्ष तिकडच होत, आणि ते मोठ्याने ओरडले.. "बरोबर आहे" म्हणाले.. तोवर मी घाबरून  माईक घेऊनच चार पावलं पुढे गेलो... सर अरे म्हणाले बोल बोल..
पुन्हा जाग्यावर येऊन चालू केलं..
"गुलाबाचे रान तुडवत तिच्या राजकुमारचा घोडा येत असतो, त्या घोड्यावर बसून जाण्यासाठी तिचा जीव तीळतीळ तुटत असतो, ते असत ते निस्वार्थी निशरीरी आणि खरं प्रेम..." अंजली कडे बोट दाखवत हे वाक्य बोलाताना मग खूपच मोठं धाडस आल. भाषण संपलं... सर्वांनी टाळ्या वाजवल्या,  अंजलीने देखील वाजवल्या असतील... सगळ्यांनी आपल्या मनोगतात माझ्याबद्दल उद्गार काढले... नंबर दिला... स्पर्धा संपल्या... पोरांच्या चर्चा झाल्या.
        खरं अंजली काय इम्प्रेस नाही झाली मग नवीन स्पर्धा नवीन काहीतरी नाटक चालूच होते आमचं. सगळी म्हणायचीत,  बारावी आहे. टाईमपास बंद कर. तेंव्हा अंजलीच्या प्रतिक्रिये विना माझ्या माझ्या प्रेमाचा टाईमपास झाला होता. हे माझ्या लक्ष्यात आलं तिच्या होकराविना माझ प्रेम अधुरं आणि एकतर्फी होत. तिला कस सांगाव म्हणून एक कविता रचली.
गप्पच रहावस वाटत
तुझ्या जवळ बसल्यावर
हातात हात घेऊन
डोळे शांत मिटल्यावर
                     
                                      शब्द काही सुचत नाहीत
                                      तू समोर असल्यावर
                                      डोळे फक्त बघ
                                      मी निरागस वाटल्यावर
भास होतो मला
तुझ्या अस्तित्वावर
आणि हातात हात दिलेल्या
तुझ्या त्या हातांवर...
  
                                      मन काही मनात नाही
                                      तुझा होकार येण्यावर
                                      मागूनच फिरावं वाटल
                                      तू सोबत देखील असल्यावर
    
   


  या नंतर दोन दिवसानंतर एक फिल्मी प्रसंग घडून आला माझ्या आयुष्यात केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल साठी
उभा असताना दोन मुली अकरावीच्या माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या तुझ्याशी थोडं बोलायचंय. त्यामधील एक ओळखीची होती पण दुसरी नव्हती. ती दिसायला खूप सुंदर तिचं नाव गौरी होतं... गौरी अंजली पेक्षा सुंदर होती. गौरी हे टोपण नाव होत तिचं खरं नाव स्नेहल होत. पण तेव्हा माहित नव्हतं मग ओळखीची ती रुक्सार म्हणाली, 'अभिदादा तुझ्याशी गौरीला काहीतरी बोलायचंय आहे'.
मी म्हटलं बोला,
तर गौरी म्हणाली.... नाही इथं नाही... बाहेर कुठतर बोलायचंय... नंबर मिळल का आपला..?
          लगेच केमिस्ट्रीच्या जरनलच मागचं पान पाडून त्याच्यावरती नंबर लिहून दिला. आणि प्रॅक्टिकल ला गेलो मग सगळे मित्र पाच पाच मिनिटाला विचारायला...
भावा, काय झालं काय म्हणती...
अरे भावा मोबाईल बघ ना आला का फोन...
अरे मेसेज येईल सायलेंट ला व्हायब्रेट लाव...
सगळी सगळी उतावळी झाली होती तिच्या मनात काय आहे काहीच माहीत न्हवत आणि आमच्या कडे तिचा नंबर न्हवता. तिचा मोबाईल चांगला म्हणजे तेंव्हा फेसबुक ओपन होणारा आणि आमचा सात, नऊ आणि तीन नंबरची बटन पडल्याला कीपॅड मोबाईल.
प्रॅक्टिकल झालं आणि घरी जाऊन झोपलो. आणि पाच वाजताच उठलो
           तोवर गौरीचे वीस मिस कॉल आणि दहा-बारा मेसेज येऊन पडल होत.  बेचैन झाली होती ती बोलण्यासाठी
कॉल बॅक करावा तर अडिज रुपये बॅलन्स तोदेखील दहा रुपयाचं लोन घेऊन उरलेला. अशी आमची गत. लगेच गौरीचा परत फोन आला आणि आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीशी मोबाईलवर बोलण्याचा योग सार्थकी आला. ती बोलू लागली, विचारू लागली... मला तुम्ही आवडता... तुम्ही खूप छान भाषण केलं... तुमचं म्हणजे स्पीच रायटिंग खूप छान होते... आणि विचार खूप छान वाटला... तुम्ही प्रेमा विषय असणारी अनेक गैरसमज दूर केलात... भारी अस लय भारी वाटत होत अस वाटत होत, की तुम्ही हे सगळ माझ्या साठीच लिहाल आहात.
             तेंव्हा मला काहीच सुचेना, मग आता अंजली की गौरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं सगळी म्हणू लागली अंजली पेक्षा गौरी भारी आहे भावा.. अंजली नको.. मग काय करावं... शेवटी गौरी ला म्हणालो तिला सगळं सगळं खरं सांगून टाकलं.  गौरी अग मला अंजली आवडते आणि ती मा पाहिलं प्रेम आहे. मी भाषण देखील तिच्या साठी केलं होत.
गौरी म्हणाली तिचं देखील आहे का तुझ्यावर प्रेम..? हताश होत तिने प्रश्न केला,
मला नाही नाहीये ग...मग म्हणली,
आपण बघू अगोदर तिचं आहे का मग ठरवू नकार नको देऊ मला...प्लीज
            दुसऱ्या दिवशी गौरीने अंजली ची भेट घेतली तिला विचारलं सांगितले, माझ्या मनातलं तिला सगळ, पण अंजली ने मात्र नकार दिला. ती म्हंटली माझ एका दुसऱ्या मुलावर ते प्रेम आहे. मी नाही विसरू शकत त्याला. अभीजीत ला सांग मला विसर म्हणून. उगाच माझ्या मागून एका आशेवर फिरू नको म्हणावं त्याला, काही उपयोग नाही होणार त्याचा. खूप वाईट वाटलं, अंजली सोडुन जाणार मला अस वाटू लागलं. पण ती न्हवती च माझ्या आयुष्यात हे काही मान्य होईना माझ्या भित्र्या मनाकडून. पण तरीही गौरी तिला विनावत होती. माझ्यासाठी, गौरी तिला खूप समजावू पाहत होती पण ती असफल ठरली.
         तेव्हा गौरी  मला येऊन म्हणाली, 'जीत' आयुष्यात आपल्याला खूप काही हवं असत. स्वप्नाच्या दुनयेत आपण खूप स्वप्ने पहिली असतात. आपलं कमजोर मन प्रत्येक वेळी आपल्याला हा भास किंवा हा अस जाणवून देत असत की तुला ती मिळेल मिळेल आणि मिळेल... पण हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच अस नाही रे. काही गोष्टी दैवान आपल्या नशिबी नसतात लिहल्या. मग आपण दैवाच्या तरी विरोधी नाही ना जाऊ शकत, म्हणून अश्या वेळी आपल्याला कॉम्प्रमाईज कराव लागत. आणि पहिलं प्रेमाच तू म्हणत असलास तरी पहिलं प्रेम कधी कुणाच्या नशिबात नसतं रे.  तिला विसर आणि आपण पुन्हा आपल्या प्रेमाची नव्याने सुरुवात करुया. हवं तर माझ्याशी पहिला मैत्री तर कर. खुप प्रेम आहे तुझ्यावर, माझं उभा आयुष्य मी तुझ्यासोबत जसं असेल तसं जगायला तयार आहे प्लीज देशील कारे मला साथ तुझ्या प्रेमाची...?
करशील का रे माझ्यावरती अंजली इतकं प्रेम...?
एकदा हो म्हण.. जीत फक्त एकदा हो म्हण...
                              ✍️ अभिजीतभाटळे.        
                                    मु/पो राधानगरी
                                    तालुका राधानगरी
                                    जिल्हा कोल्हापूर
                                    फोन ९७६४३६९०९८